हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरणाचा आढावा

हळद धोरणाची गरज

हळद हे महत्त्वाचे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. तथापि शेतकऱ्यांना त्याप्रमाणात आर्थिक लाभ मिळत नसल्याने हळदीच्या सर्वंकष विकासासाठी सर्व सहभागीदार यांनी पुढे येऊन हळद लागवडीपासून ते काढणी, प्रक्रिया व विपणनापर्यंत येणाऱ्या सर्व अडचणींचा विचार करून त्यावर उपाययोजना सुचविण्याकरिता हळद धोरणाची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत हळद विपणन, निर्यातीमध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांचा नगण्य सहभाग विचारात घेता हळद विपणन व निर्यातीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करण्याकरिता धोरणाची आवश्यकता आहे. हळद लागवड, प्रक्रिया व विक्री या अनुषंगाने येत असलेल्या समस्यावर उपाययोजना करण्यासाठी लोकप्रतिनिधींची मागणी होत आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांना विविध कृषी विषयक, पणन विषयक व मसाला मंडळाच्या योजनांचा लाभ अभिसरणाद्वारे उपलब्ध करुन देणे; हळद उत्पादन, प्रक्रिया, निर्यात इ. बाबत कार्यरत सर्व संबंधित संस्थांच्या एकत्रित सहभाग, याअनुषंगाने येत असलेल्या समस्यांवर उपाय योजना करणे व त्याद्वारे सर्व संस्थांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वंकश हळद धोरणाची गरज निर्माण झालेली आहे.

हळद संशोधन व प्रक्रिया धोरणाची ७ उद्दिष्टे

  1. हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना किफायतशीर, खात्रीशीर व व्यवहार्य तंत्रज्ञान उपलब्ध करुन देणे.
  2. हळद उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी करुन त्याचे उत्पन्न दप्पट करणे व त्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे.
  3. हळद लागवडीच्या आदर्श पद्धती तयार करणे.
  4. हळद काढणी, प्रक्रिया इ. बाबत सद्यस्थितीत उपलब्ध असलेल्या नवीन यांत्रिकीकरणासंदर्भात शिफारस करणे.
  5. हळद पॅकेजींग, विपणन, ब्रँडींग, निर्यात याकरिता बाजार साखळी विकसित करणे.
  6. वेगवेगळ्या योजनांचा कृति संगम (convergence) करुन शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे.
  7. हळद लागवड ते विपणनाच्या अनुषंगाने शेतकरी, प्रक्रियादार, निर्यातदार यांना येत असलेल्या समस्यांची सोडवणूक करणे.