कृषी विद्यापीठांचे कार्य व तंत्रज्ञान प्रसार

नवीन व कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची शिफारस करणे, हळद पिकाची लागवड पद्धती (रुंद सरी वरंबा, एक डोळा पद्धत), शेडनेट, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (जैविक खते, विद्राव्य खते, सुक्ष्म मुलद्रव्यांचा वापर), एकात्मिक कीड व्यवस्थापन, आंतरमशागत पाणी व्यवस्थापन (ठिबक सिंचन), सेंद्रीय हळद लागवड, नवीन फळबागांमध्येव वानिकी पद्धतीमध्ये हळद या पिकाचा आंतरपीक म्हणून अंतर्भाव करणे इत्यादी बाबत विविध राष्ट्रीय स्तरावरील हळद संशोधन संस्थांच्या सुधारित तंत्रज्ञानाच्या बाबींचा राज्याच्या हवामान परीस्थितीमध्ये कृषी विद्यापीठांद्वारे अभ्यास करुन त्याची शिफारस होणे आवश्यक आहे. तसेच कृषी विद्यापीठाच्या पडिक जमीनीवर हळद लागवडीसाठी व प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी कंत्राटी/ भाडे तत्वावर जागा उपलब्ध करुन देण्याचे प्रस्तावित आहे. सार्वजनिक- खाजगी भागीदारी प्रकल्पाच्या (पीपीपी) माध्यमातून खाजगी हळद संशोधन संस्था तसेच यानुषंगाने कार्यरत इतर शासकीय सार्वजनिक संस्थांच्या सहभागाने हळद विकासासाठी कार्य करण्याचे प्रस्तावित आहे. भाभा अणू संशोधन केंद्र व कृषी विद्यापीठे यांच्या सामंजस्याने भाभा अणू संशोधन केंद्र, ट्रॉम्बे, मुंबई यांनी विकसित के लेले ऊतीसंवर्धन तंत्रज्ञान तसेच विकिरण तंत्रज्ञान सुविधा युनिट स्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. हळदीपासून खाण्याचे विविध रंग तयार करण्याच्या दृष्टीने कृषी विद्यापीठांद्वारे संशोधन व याबाबतचे तंत्र विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. जेणेकरुन, हळदीपासून नैसर्गिक रंग निर्मिती उद्योग विकसित होऊ शकेल.

हळद उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड खर्च कमी करुन त्याचे उत्पन्न दप्पट करण्याच्या दृष्टीने कृषी विद्यापीठांनी शिफारशी देणे आवश्यक आहे. क्षेत्रीय अधिकारी/कर्मचारी यांना आदर्श हळद लागवड पद्धती (GAP), हळद प्रक्रिया, हळद विपणन, ब्रँडींग इ. बाबत अद्ययावत ज्ञान, कौशल्य असणे अत्यंत आवश्यक आहे. जो पर्यंत क्षेत्रीय अधिकारी/ कर्मचारी यांचे या बाबींसदर्भात क्षमता बांधणी होणार नाही, तोपर्यंत हळद उत्पादक अद्यावत तंत्रज्ञानाबाबत अनभिज्ञ राहतील. हळद धोरणांतर्गत या घटकांची क्षमता बांधणी करण्याचे प्रस्तावित आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांनी राष्ट्रीय स्तरावरील हळद संबंधित संशोधन संस्था/ विद्यापीठे यांनी शिफारस व विकसित केलेली लागवड पद्धती, शेडनेट, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (जैविक खते, विद्राव्य खते, सुक्ष्म मुलद्रव्यांचा वापर), एकात्मिक कीड व्यवस्थापन, आंतरमशागत पाणी व्यवस्थापन (ठिबक सिंचन), सेंद्रीय हळद लागवड, विविध हळद उत्पादने व त्यांच्या प्रक्रिया पद्धती इत्यादी तंत्रज्ञानाची राज्याकरिता अंमलबजावणी व्यवहार्य आहे किंवा नाही याची पडताळणी करुन राज्य शासन फलोत्पादन विभाग, हळद उत्पादक, प्रक्रियादार, उद्योजक यांचेपर्यंत पोहोचविण्याकरिता आवश्यक करारनामा करण्याचे प्रस्तावित आहे.

कृषी विद्यापीठांद्वारे शेतकऱ्यांना सुधारित वाणांची व रोपांची उपलब्धता होण्याच्या दृष्टीने रोपवाटिका, ऊती संवर्धन प्रयोगशाळा स्थापन करणे, कु रकु मीन निर्मिती सुविधा, कीड रोगांचे पूर्वानुमान करणारी ICT आधारित माहिती तंत्रज्ञान सुविधा तयार करणे, हळद उत्पादन संदर्भात माहितीकरिता मोबाईल ॲप (कृषीक ॲप) चा वापर करणे, कीटकनाशके उर्वरित अंश, कुरकुमीन प्रमाणे, जड धातू, सुक्ष्मजीव व पोषकतत्व तपासणी, ऊती पाने व देठ तपासणीची सुविधा तयार करणे, हळदीची टिकाऊ क्षमता वाढविण्याकरिता विकिरण सुविधा तयार करणे तसेच बदलत्या हवामानाचा पाऊसमान, पीक हंगाम, पिकांची वाढ व उत्पादन यांसारख्या बाबींवर होणारा परिणाम अभ्यासणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सदर बाबींच्या संशोधन व विकासाकरिता कृषी विद्यापीठाकडील पायाभूत सुविधांचे बळकटीकरण व आवश्यकतेनुसार नवीन सुविधा तयार करण्याचे प्रस्तावित आहे.